ब्लॅक अँड व्हाईट कहाण्या

 

साधारण जुलै-ऑगस्ट मध्ये सगळीकडे सणवार, प्रथा-परंपरा, त्या चूक का बरोबर, त्या त्या दिवसाचे स्पेशल पदार्थ, वाणाच्या वस्तू, साड्या, दागिने याबरोबर आणखीन एक गोष्ट व्हायरल होते. हो गोष्टच, पण त्या त्या सणाची. त्या त्या दिवसाची. श्रावणातल्या कथा, मग कधी त्या आधुनिक साज लेवून  तर कधी अगदी परंपरागत रूपात.

प्रत्येक दिवसाला, प्रत्येक सणाला छानशी कथा. आटपाट नगराने सुरू होणाऱ्या आणि “उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका” सांगत  ‘सुफळ संपूर्ण’  होणाऱ्या या कथा सांगोवांगीच्याच.  कुठे कधी सुरुवात झाली याचा इतिहास अज्ञातच.

 सगळ्या कहाण्या तशा अगदी ब्लॅक अँड व्हाईट. सरळ साध्या. राजा असेल तर, आवडती नावडती राणी. एक  गुणी तर दुसरी अगदी विरुद्ध.  कहाणी ऐकतानाच एकीचा राग यावा आणि एकीचे दुःख कधी संपते याची वाट पहावी, इतका विरोधाभास. नावडती कितीही त्रास झाला तरी चांगलीच वागणार आणि आवडती वाईटच. एक जण वसा चालवणार तर एक जण घेतला वसा टाकणार. सरळ सोट मार्गाने चालणारी कथा. सांगितलेले व्रत  केले की अपेक्षित फळ मिळणारच. देव देवता प्रसन्न होऊन वर देणारच आणि शेवटी सगळ्यांचे भले होणार याच वळणावर थांबते.

 फार काही अद्भुत घडत नाही. स्टोरी प्लॉटमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स नाहीत किंवा जगा वेगळ्या संकल्पनाही नाहीत.  पण “ऐका गणेशा तुमची कहाणी” अशी सुरुवात झाली की कान टवकारले जातात ते ‘निर्मळ मळे नि उदकाचे तळे’ डोळ्यापुढे दिसायला लागते.  खुलभर दुधाच्या गोष्टी तील आजी पितळी गडू घेऊन काठी टेकत चालायला लागते आणि पंचमीचे लांडोबा पुंडोबा  बहिणीची पूजा बघताना जसेच्या तसे मनात,  मेंदूत साठवले जातात. श्रावणी शुक्रवारची बहीण ते दुसऱ्या दिवशीची म्हणजे शनिवारची केनी कुर्डूची भाजी करणारी सून, सगळ्या बायका खऱ्या वाटतात.  लहानपणी तर मला ती केनी कुरडूची भाजी कशी असते याचे फार कोडे पडायचे. जंगलात गेले की साती आसरा भेटतात आणि नाग, साप गाई, वाघ मराठीत बोलतात हे खरे वाटण्याचे ही एक वय होतेच आणि प्रत्येकाचे असतेच.

आजही या कथा आवडतात माहीत असूनही ऐकाव्या वाटतात.  कारण?कारण अगदी सोपे आहे. इतका सरळ, साधा विचार, त्या विचारांचा ब्लॅक ॲंड व्हाईट प्रवास आणि शेवट आता गोष्टीतही विरळाच असतो.

-श्रुतकीर्ती

०४/०८/२०२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान