गोपाळकाला

 

फिरून फिरून भोपळे चौकात झालेय मेंदूचे, मनाचे.  प्रत्येक कामाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेतरी खाणे, जेवण, अन्न याचा रेफरन्स जोडलेला असतोच. अगदी आजची जन्माष्टमी सुद्धा कृष्णाबरोबरच, अगदी त्या क्षणातच गोपाळकाल्याचा विचार मनात,  डोळ्यापुढे चित्र आणि जिभेवर चव घेऊनच आली. काही काही पदार्थ कशाच्या तरी जोडीने येतात तेव्हाच छान वाटतात. उगीचच खायला गोपाळकाला केला आहे, हे शक्य असले तरी कानाला जरा जडच जाते. पण गोकुळाष्टमीला जोडून ते एका लयीत येते.

मला स्वतःला अंदाज पंचे धागोदरसे वाले पदार्थ आवडतात. इतके ग्रॅम,  तितके मिलिलिटर, ठराविक टेंपरेचर म्हटले की उगीचच फसणार चे लाल निशाण आधीच फडकायला लागते.  त्या बॅकग्राऊंड वर गोपाळकाला हा पदार्थ यादीत भेळेबरोबरच  अव्वल स्थानावर आहे. चुकायची काळजी नाही. न आवडायचा प्रश्न नाही. कुणाला फारच आवडला तर रेसिपी द्यायची भानगड नाही. जे आहे ते मनोभावे मिसळा, तयार. एवढे सांगितले आणि स्वतःला समजले की पुरे असते. न आवडणाऱ्या ने प्रसाद म्हणून खावा आणि माझ्यासारख्यांनी कृष्णाला आवडतो च्या नावाखाली पोटभर खावा, हेच खरे.

वर वर विचार केला तर अगदी सरळ,  सोपे , साधे  सगळे. सरळ दिसणारे सगळ्यात अवघड असते हेही तितकेच खरे. साधे दही, दूध, लाह्या, लोणचे पण शेंगदाणे -हरभऱ्याची डाळ भिजत घालायचे लक्षात ठेवावे लागते.  लोणचे छान मुरलेले म्हणजे, आधीच्या वर्षीही लोणचे घरी घातलेले असावे लागते. साईचे दही मन लावून विरजलेले असले की साखर कशाला लागते इत्यादी इत्यादी… वरवर नुसती सगळे मिसळण्याची प्रक्रिया. पण ती इतकी सरळ सोपी असती तर त्या विष्णूच्या सगळ्यात लोभस अवताराला नैवेद्यात अर्पण करण्याच्या पदार्थाची असलीच कशी असती?

प्रत्येकाची करण्याची पद्धत आपापली,  खासियत आपापली, काही घटकही वेगळे. पण तयार झाल्यावर कृष्ण जन्मानंतरची त्याची चव सगळीकडे सुंदर आणि तितकीच सात्विक.

प्रत्येकाचा कर्मयोग वेगळा तरीही तो प्रामाणिकपणे अनुसरणार्या सगळ्यांचा शेवट सारखाच, हे सांगणाऱ्या गोपाल कृष्णाचा काला प्रत्येक ठिकाणी वेगळा खरा पण तो चवीला फसल्याचा कधी ऐकलाच नाही, कधी कुणाचा.

-श्रुतकीर्ती

-१९/०८/२०२२




Comments

  1. काही वर्षांपूर्वी तू केलेला गोपाळकाला आठवला ♥️💕🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. पुन्हा तसेच सगळ्यानां एकत्र यायला मिळो, तर मग मजा गोपाळकाल्याची.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान