कहानी पोटली बाबा की!

 

गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीच्या एका शिकाऊ ड्रायव्हरला सिग्नल ला शांतपणे उभे असताना मागून येऊन एकाने धडक दिली. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. गाड्यांचे नुकसानही झाले नाही. हे सगळे ऐकल्यावर “ चला बरे झाले काही वाईट झाले नाही”  असे आपसूकच तोंडून निघाले. पण शिकवू ड्रायव्हर पटकन म्हणाला "Now I have a car crash story to share, my first crash story" फार मजा वाटली. खरच किती गोष्टी वेल्हाळ आहोत आपण . सगळ्याची  एक गोष्ट असते.  लहानपणी चिऊ काऊ करत सुरू झालेल्या गोष्टी अशा रोजच्या अनुभवांपर्यंत येऊन पोहोचतात. मनोरंजनाचे पहिले साधन जे आपल्याला कळते तेच असते गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे.  नुसत्या कल्पना, मग त्या कल्पनांमध्ये अनुभव,  कधी एखादा सहज न पचनी पडणार सल्ला. या सगळ्याचे मिश्रण करून तयार होणाऱ्या गोष्टी तर महत्त्वाच्याच पण त्याहीपेक्षा रंजकदार पद्धतीने त्या सांगणारा महत्त्वाचा.  सांगणारा गोष्टीची मजा वाढवतो किंवा घालवतो.  आई बाबा,  आजी आजोबा यांच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकताना गोष्टी इतकेच त्या सांगणाऱ्याच्या आवाजाने,  अविर्भावांनी खिळवून  ठेवलेले असते.  नुसती गोष्ट आठवतच नाही.  ती सांगणारा किंवा सांगणारी त्याबरोबर कानात वाजत असतात.  डोळ्यापुढे दिसत असतात.  पारावर बसून गाव गप्पा सांगणारा एखादा रिकामा माणूस ते भल्या मोठ्या स्टेजवरून हजारो लोकांना खेळवून ठेवणारा खेळिया दोघांचेही गोष्ट सांगण्याचे,  लोकांचे लक्ष खेचून घेण्याचे कसब एकच. गोष्टीतील विविध पात्रांच्या रूपातून प्रकट होताना तो एकच कथाकार एका वेळी किती आयुष्य जगतो. एकच ते पु. लं. पण पेस्तनजी त्ते चितळे मास्तर ते  नामू शिंपी सगळ्यांना डोळ्यापुढे उभे करतात आणि नकळत पुढच्या वेळी पुस्तकातून तीच गोष्ट वाचताना आपण मनातल्या मनात तोच हेल काढून वाचतो.

 गोष्ट सांगता येणे.  मनातले चार जणांना समजेल रुचेल असे सादर करणे,  यात किती मजा आहे. कुठेही  जा किस्से गोष्टी सांगणाऱ्याच्या भोवती माणसांचा गराडा कायम असतोच असतो.  गोष्टी सांगणारा म्हटले की का कोण जाणे डोळ्यापुढे दूरदर्शन वरची रविवारची ‘पोटली बाबा की’ सिरीयल आठवते.  तो कठपुतलीतला  दाढीवाला बाबा त्याची पोतडी आणि त्यातून निघणाऱ्या सुरस कथा. वर्षांवर्ष त्या गोष्टी लक्षात राहण्याचे कारण कदाचित पोटली वाला बाबाच होता. कवी गुलजारांनी लिहिलेले ते गाणे आणि मग येणाऱ्या जगभरच्या परिकथांचे हिंदी रूपांतर,  लक्षात राहिले ते त्या सादर करणाऱ्या कठपुतलीतल्या  त्या बाबा मुळेच.

 त्याच्या पोतडीत असंख्य गोष्टी होत्या. आपल्याकडेही आहेतच.  जगणाऱ्या प्रत्येकाकडे एक गोष्ट तर असतेच.  खरंच जगलो तर जगण्याची गोष्ट होऊन जाईल. पण तूर्तास तरी सांगायला गोष्ट नसली तरी गोष्ट ऐकायची तयारी तर कायम असेलच.

- श्रुतकिर्ती

-२६/०८/२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान