कशासाठी? जगण्यासाठी.

 

बराच वेळ गाडीत बसायचे असले की रेडिओला पर्याय नसतो. परवा असेच झाले. संध्याकाळी गर्दी असल्याने वेळ वाढतच गेला. त्यातच स्टेशन्स फिरवताना कुठेतरी ‘आईस्क्रीम ब्रेड’ हा शब्द ऐकला आणि कान टवकारले गेले. एबीसी रेडिओ वर आईस्क्रीम ब्रेड टेस्टिंग बद्दल काहीतरी बोलत होते. नेहमीच्या वा वा , छान छान नंतर ही पाककृती ‘डिप्रेशन एरा’ मधील आहे असे काहीतरी म्हटले गेले. कार्यक्रम संपला माझा प्रवासही संपला. पण हा शब्द काही पाठ सोडेना. जरा शोधाशोध केल्यावर खजिनाच  सापडला. अमेरिकेतील शेअर बाजार कोसळल्यावर,  1929 ते  1939 या काळातल्या अत्यंत आर्थिक मंदीचा हा काळ.  ताज्या अन्नपदार्थांचा तुटवडा,  आर्थिक चणचण या सगळ्यातूनही सगळ्यांना खाऊ तर घालायचं . मग या बायका, हुशार बायका असे शोध लावायच्या. वितळलेले आईस्क्रीम पीठात मिसळून ते बेक केल्यावर तयार झालेला हा पदार्थ बराच चांगला झाला होता. कारण न मिळणारे दूध, साखर त्यात होते. ज्या कुणी तो शोधला त्याचे कौतुक वाटले.  गरज शोधाची जननी याचे उदाहरणच जणू. जे काही मिळत होते त्यातच कल्पकता दाखविली गेली होती.  जेवायला काय आहे? या प्रश्नाचे एक मजेशीर उत्तर त्या काळात प्रसिद्ध होते. ‘ ब्रेड आणि टेबलाखालचे बदक.’ वरवर मजेशीर वाटणारे हे उत्तर त्रासदायक आहे. खरे कारण याचा अर्थ नुसता ब्रेड हेच आहे. कारण टेबलाखालचे बदक पळून गेले आहे. हे सगळे वाचताना, ऐकताना अनेक भावना जाणवल्या. पण सगळ्यात पटकन आठवला तो वडापाव आणि मिसळपाव. कामगारांची भूक कमीत कमी वेळात आणि खर्चात भागवणारे हे पदार्थ,  आज पॉप्युलर आहेत.

माणसाची जगण्याची इच्छाशक्ती चिवट असते. त्यासाठी शक्यते प्रयत्न तो करतोच. याचे हे पुरेपूर उदाहरण आहे. रेशनवर जे काही मिळेल, अंगणात थोडे बहुत जे उगवेल,  त्याचे विविध प्रकार करून पोटभर पदार्थ तयार करण्याची युक्ती शोधणाऱ्याचे जेवढे कौतुक करावे तेवढे थोडे.

आजी आजोबा जे  युद्ध आणि दुष्काळातल्या रेशनच्या मिलो ज्वारी आणि लग्नाची पत्रिका दाखविली की मिळणारी पाच किलो साखर याचे वर्णन सांगायचे त्याचे साम्य याच्याशी जाणवले. जगभरची माणसे सारखीच, अडचणी आणि प्रश्नही सारखेच आणि त्याची उत्तरे शोधून काढायची तळमळ ही सारखीच. रेडिओच्या कार्यक्रमाने मेंदूला खाद्य दिले. गुगलने इतिहासाचे पुरावे,  पदार्थांच्या याद्याच याद्या पुरवल्या. अनेक वर्णने फोटो आर्टिकल्स दिसले. काही पाहून, वाचून पोटात पार तुटले. काहींचे विस्मय वाटले पण त्या कार्यक्रमात आलेल्या बाईंचे उत्तर मनात कायम राहिले.  विचारले होते, यातले कोणते पदार्थ आता करतेस?  गंमत म्हणून हे पदार्थ करून बघण्याचा ट्रेंड आला आहे हे कळल्यावर, ती 80 च्या घरातली आजी पटकन … “आय स्टील ह्याव सॉफ्ट स्पॉट फोर धीस.” असे  म्हणाली आणि कोंड्याचा मांडा करणाऱ्या त्या सगळ्यांच्या मनातली गंमत म्हणूनही हे पदार्थ न करावे लागण्याची इच्छा, भरल्या पोटाच्या, तो काळ माहीतही नसलेल्या माझ्या मनाला तीव्रतेने जाणवली.

शेवटी काय माणसाच्या गरजा तर त्याच.  काळ, वेळ,  प्रदेश,  देश कितीही बदलला  तरी जगण्याची तेही आनंदात जगण्याची इच्छाशक्ती प्रत्येकाची अगदी तशीच. पाडगावकरांची माफी मागून म्हणावे वाटते,

जगण्यावरचे प्रेम म्हणजे काय असते? शेवटी तुमचे आणि आमचे अगदीच सेम असते!

- श्रुतकिर्ती

०५/११/२०२२



Comments

  1. श्रुती, ख्वाबिदा हे title परत एकदा सार्थ केलंस. तो Radio program “तो” काळ जगलेल्यांनी आणि “हा” काळ उपभोगणार्यांनीही ऐकला असेल, परंतु ख्वाबिदाने तिच्या संवेदनशील मनोबुद्धीने आठवणीतल्या साच्यातून general facts च्या सहाय्याने positive thinking ने , जी universality आमच्यासमोर मांडली, ती one of a kind.

    I enjoyed this ✍️ , thanks for my good morning weekend read ~ कल्याणी ♥️💜

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you fot yuor kind words Kalyani, glad to hear that you enjoyed your morning read.

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान