समज

 

मी काय सांगितले ते समजले का?”शेकडो वेळा किती तरी जणांच्या तोंडून हे वाक्य ऐकले असेल. कधी कधी आपणही म्हटले असेल.  पण नक्की काय असते समजणे?  समजते म्हणजे होते तरी काय?  मेंदूला म्हणाला काही कळते का? का ज्या अवयवाकडून एखादी कृती अपेक्षित आहे, ती कशी-कधी -केव्हा- कां करायची याची इन्स्ट्रक्शन कशी द्यावी हे मेंदूला कळते का? नक्की काय घडते?

  विचार केला तर, असा लख्ख प्रकाश पाडणारा एखादा क्षणच  असतो जो बऱ्याच गोष्टी, न कळणे गटातून कळले गटात टाकून देतो. पण कधी कधी न करण्यातून,  मला कळले-उमगले- समजले हे कधी घडते तेही तर समजत नाही. मनात, मेंदूत खोलवर कुठेतरी उत्पन्न होणाऱ्या आंतरिक संवेदना ज्यांना आपण समज म्हणतो त्या मनात मेंदूत त्यांची एक सृष्टी निर्माण करत असतात. त्यात असणाऱ्या सगळ्या संवेदना वेळी आवेळी,  मेंदू/ मन लागेल तशा वापरते आणि आपण समजले किंवा नाही समजले, हा खेळ खेळतो. कधी कधी हा खेळ इतका पटकन घडतो की समजले  कधी हे ही समजतच नाही. मग मन त्याला लेबल लावते,  उमजले, उमगले,  नकळत कळले, इत्यादी इत्यादी. या आंतरिक संवेदना किती प्रकारच्या आणि किती गुंतागुंतीच्या असतील याचा विचार करणेच अवघड. चांगले-वाईट,  आनंद-दुःख, यश -अपयश,  थोडक्यात सगळे जगणे यांच्यावरच अवलंबून.  आपला दृष्टिकोन,  विचारसरणी, मनाच्या धारणा त्यात होणारा किंवा न होणारा बदल या समजावरच  तर अवलंबून.

एका क्षणात संधी प्रकाशात किंवा चष्म्यावर बाष्प जमल्यावर जसे अंधुक भेसूर  दिसते तेच सगळे सूर्योदय झाल्यासारखे लख्ख दिसते जेव्हा समजते.  माहिती मिळणे, तिचे प्रोसेसिंग होणे आणि त्यावर अपेक्षित कृती-निर्णय म्हणजेच जर समजणे असेल तर किती पटकन घडते हे रोजच्या आयुष्यात.  सिग्नल लालचा हिरवा झाल्यावर गाडीने जागा सोडण्यासारखे. आणि काही बाबतीत मात्र वर्षानुवर्षे हे असे का याचा गुंता न सुटता सुटणारा. आणि तरीही हे मला समजले असे ठामपणे न सांगू शकणारा.  या समजण्याची पण मजा आहे, जे मला समजले ते समोरच्याला तसेच कसे समजणार?  प्रत्येकाच्या संवेदना जाणीवा वेगवेगळ्या हे समजूनही, आपण आपल्या नजरेने दुसऱ्याला जग दाखवणे समजावणे थांबवतच नाही कधी. समजूतीचा अट्टाहास संपतच नाही.  सगळे समजणाऱ्या मनाला, मेंदूला समजायला लागणारा वेळ, परिस्थिती, त्याचे उत्तर वेगवेगळे असणार आहेत हेच कसे कळत नाही?

समजणे ही जर इतकी टेक्निकल प्रोसेस असेल तर न समजण्याचे दुःख आणि समजण्याचा अहंकार का धरावा हेही कसे त्याला समजत नाही?

मग वाटते या मनाची/ मेंदूची आपल्या आपल्या संवेदनांनी केलेली ही जी सृष्टी आहे ,तीच जर  ठरवते समजले का नाही, हे चूक ते बरोबर,  तर मग चूक बरोबर कळणे- न कळणे  इतके महत्वाचे नसतेच काही. तो असतो फक्त संवेदनांचा प्रवास, आणि त्यातून तयार झालेला दृष्टिकोन. एवढे समजले आता बाकी काही नाही समजले तर त्यात काय वाईट वाटून घ्यायचे!

- श्रुतकिर्ती

१९/११/२०२२



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान