दिवस

 "आकाशवाणी पुणे, सुधा नरवणे प्रादेशिक बातम्या देत आहे.", किंवा ' इति वार्ताः " अशी दिवसाची अनेक वर्षे सुरवात होत असल्याने सकाळी सकाळी गुगल ला काहीतरी वाजवायला लावल्याशिवाय सकाळच्या कामांना गती येत नाही.

माझे आणि त्या गूगल काकूंचे फार संख्या नाही. लावायला एक सांगितले कि लागते भलतेच. कुमार गंधर्वांचा, अक्षय कुमार करणारी गूगल मग डोक्यात जाते बऱ्याचदा. चूक तिची नसतेच. एक तर माझा accent तिला कळत  नाही नाहीतर माझी आणि तिची गती मॅच होत नाही. असेच आज सकाळी काहीतरी लावताना तिने अचानक, "बुद्धा वीकली" नावाचा यु ट्यूब चॅनल लावला. वैतागून स्टॉप म्हणायच्या आत एक शांत गंभीर आवाज, 'Chant with us ." म्हणाला आणि मी थबकले, काय म्हणतोय ऐकू या म्हणून ऐकत राहिले. आधी दोन एक मिनिटे काहीतरी माहित सांगत होते पण माझे लक्ष त्यातून उडालेले होते. त्या तिबेटी भिक्कूच्या आवाजामुळे हा आता 'ओम मणी पद्मे हम' म्हणतो कि काय? मग त्या वाक्य बरोबर डोळ्यापुढे  आलेली अनेक बुद्ध लेण्यांमधली चित्रे, तिसरी-चौथीमध्ये असतानाची काळ्यापांढर्या दूरदर्शन वरची नेपाळ मधली स्मगलिंग वरची सिरीयल आणि त्यातले ते मंत्राचे यंत्र. त्यात लपवलेले हिरे का ड्रग्ज, नक्की काय ते आठवेना. हे सगळे डोळ्यापुढे  येऊ लागले.

तेवढ्यात त्या गंभीर आवाजाने शांतपणे एक मंत्र म्हणायला सुरवात केली. काही शब्द कळले काही नाहीत. पण तो शांत आवाज गूगल ला थांब म्हणायची इच्छा होऊ देत न्हवता. दर पूर्ण आवर्तनानंतरची दोन क्षणाची शांतता आणि पुन्हा सुरु होणार ओम. मनातल्या दोन मिनिटांपूर्वीच्या सगळ्या दृश्य-आवाज-गोंधळाला शांत करायला पुरेसा ठरत होता. हातानी कामाचा रोजचाच वेग पकडला होता, पण मेंदूचा वेग मात्र स्थिरावला होता. एका शांत लयीत, स्थिरपणे वाहणाऱ्या पाण्यासारखा त्या विचारांचा एक संथ प्रवाह झाला होता. विचार थांबले होते असे मुळीच नाही. मेंदू-हात पाय आपली कामे करीतच होते. पण मागे कुठेतरी एक प्रवाह- एका शांत पण विलक्षण ऊर्जेने भरलेला वाहत होता. ठराविक वेळी तो विडिओ संपला. गूगलकाकू काहीतरी म्हणाल्या आणि शांत झाल्या. मीही पुढच्या कमला लागले.

त्या आवाजाने, शब्दांनी भारावून टाकल्यासारखे झाले होते. मी पुन्हा तो विडिओ लावीन का? बहुतेक नाही. त्या शब्दांचे अर्थ शोधीन का ? बहुधा नाही. पण शब्द न कळता फक्त नादाने आणि त्या गूढ गंभीर आवाजाने माझ्या मनाची  नौका दिवसाच्या नदीपार कधी नेली ते मला कधी कळलेच नाही.

रोज अश्या अनेक घटना घडत असतात आणि दिवस पार पडत राहतो. दिवस जसा वेगळा तास त्याला पार करायला लागणारी साधने वेगवेगळी . रोज दिवस उगवणार हे नक्की तसा तो पार करण्यासाठी काहीतरी योजलेले असणार हे हि नक्कीच.

 

-श्रुतकिर्ती.

२५/११/२०२२




Comments

  1. परत एकदा …. नेहमीचाच तो वाटणारा दिवस, गुगल काकुबद्दलचा अनुभवही तसाच काहीसा, पण तुझा लेख वाचल्यावर तो ॐकार आता ऐकावासा वाटतोय.~. ♥️ कल्याणी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान