सोनचाफा


काल सोनचाफ्याची भरपूर फुले वाहिलेल्या एका देवघराचा फोटो पहिला. ज्यांच्या घरचा होता त्यांच्याच अंगणातली फुले होती. फोटो पाहताच सुवास मनात दरवळला आणि भर दुपार प्रसन्न झाली. असेच थोड्यादिवसांपूर्वी अंगणात उगवलेली सूर्यफुले, दिवसाचा कोणताही क्षण हसरा करून टाकायची. या वर्षी उन्हाळा आलाय खरा पण थंडी, पाऊस गेलाच नाहीय. तरीही मधूनच तावणारे ऊन उन्हाळा आलाय हे अंगणातल्या मोगऱ्याला सगळ्यात आधी सांगते आणि तो हि बातमी खिडकी उघडताच वाऱ्याच्या झुळुकीबरोबर सगळ्यांना देतोय. कालच्या जोरदार पावसातही सिग्नलला, सगळ्या ग्रे वातावरणात गुलमोहोराचा शेंडा आणि सिग्नलचा लाल दिवा तेवढाच उठून दिसत होता. सदाफुली, कण्हेर, अबोली वर्षभर आपापल्या जागी राहून रंग उधळत असतात म्हणून त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष होते हे खरे, पण पानगळीत जेव्हा एकाही झाडाला पानफूल नसते तेंव्हा याच सदाफुलीच्या सदा फुलण्याचे विशेष जाणवते.

नखाएवढी, पेराएवढी इवलुशी इवलुशी हि फुले, पण रंग सुवासाचे भांडार असतात आणि एका दिवसाच्या आयुष्यात दोन्ही हातानी न्हवे तर असंख्य पाकळ्यांनी ते उधळून देतात.

छान उमललेले फूल, कधी त्याचे चित्र तर कधी फोटो ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्टच नसते. अगदी लॉनमॉवरच्या तडाख्यातून सुटलेले, चुकून एकटेच  उगवलेले dandelion देखील चटकन लक्ष वेधून घेते. फुले, त्यांचे रंग-गंध जगभरच्या संस्कृतींना प्रिय. भौगोलिक वातावरणाने रंगरूप भलेही वेगवेगळे पण त्यांच्या उमलण्याचे सोहोळे जगभर सारखेच.

देश बदलला कि आजूबाजूला दिसणाऱ्या रोजच्या बदलात, झाडे पाने, फुले सवयीची नसणे हे हि होमसिक व्हायला पुरणारे कारण असते. पण निसर्गचक्रच ते त्याच्या क्रमाने ते फिरत राहते आणि अनोळखी ते मैत्री या वाटेवरचा प्रवास पार पाडते. आधी अनोळखी असणाऱ्या त्या फुलांची ओळख पटू लागते. उच्चारतानाही जीभ वळणाऱ्या फुलापानांची नवे त्याच जिभेवर चटचट येऊ लागतात. हवामान बदलायला लागले कि त्यांच्या फुलण्याची वाट मन बघायला लागते. पारिजातकाच्या,नीलमोहोराच्या  फुलण्याइतकाच जॅकारॅंडाच्या  फुलण्याचाही  उत्सव होतो. लॅव्हेंडरचे मळे डोळे आणि मन निववू लागतात. सदाफुलीच्या शेजारी hydengea आनंदाने लावला जातो. रातराणी इतकाच मोराया रात्री सुगंधित करू लागतो आणि पाऊस पडून कोंदट उबदार वातावरणात चालताना जवळच eucalyptus आहे हे डोळ्याआधी नाकाला कळायला लागते.

हे सगळे सवयीचे झाले तरी मनाच्या कोपऱ्यात एक फुल खास दडलेले असते, त्याची जागा अढळ असते. सोनचाफा पाहिल्यावर काल हेच लक्षात आले.

पुढचा, मागचा जन्म असतो कां? या वादात न पडता अगदी कविकल्पना म्हणून जरी तो मान्य केला तर; कुठेतरी वाचलेले,' देवीची पुजा सोनचाफ्याने केली की म्हणे पुढचा जन्म सुंदर फुलाचा मिळतो.' ही पुराणातली वांगी देखील खरी वाटतात आणि नकळत मन या जन्मातच सोनचाफा होऊन जाते.

 

-श्रुतकिर्ती

०३/१२/२०२२



Comments

  1. खूप छान लिहिलं आहेस

    ReplyDelete
  2. नेहमीप्रमाणेच नितांत सुंदर

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान