शेवटचा दिवस



  शांत तरीही भरपूर गाज असणारा समुद्र किनारा. आजूबाजूला माझ्यासारखेच  एक दोन नमुने. लाटा येताहेत कधी फक्त जवळून तर कधी भिजवून पुन्हा गुडूप होताहेत. परत जाणारी लाट पायाखालची वाळू सरकवत असतानांच नवी लाट पाण्याचा आधार देत आहे. हे चक्र चालूच राहते. भरती, ओहोटी, खारे वारे- मतलई वारे, सगळे शिकून बरीच वर्ष झाली आहेत. तेंव्हाही ते गोंधळात टाकायचे तर आता आठवणे जरा अवघडच. पण समुद्रकाठी भर दुपारी टळटळीत उन्हात देखील जाणवणारा गारवा, फेसाळणार्या लाटा आणि ती गंभीर गाज. भूगोल इतिहास सगळ्याला दूर सारून तिथेच, त्या क्षणातच राहायला भाग पाडते. घड्याळातले काटे असूच नयेत वाटणारे हे क्षण तरीही त्यांच्या वेळेत संपतातच. पुढचा क्षण मला तो हवाय का नकोय हे विचारायला थोडीच थांबतोय. त्याला मी  तीथे आहे याची जाणिव देखील नाही. मला मात्र या सगळ्यांच्याच  असण्या नसण्याने फरक पडतो, खुप पडतो. 

भान हरपून समुद्राकडे बघत राहण्यानेही आणि भानावर येत पुढचे plan अखण्यानेही.

प्रत्येक क्षणाचे असणे मला आवडतेय मग त्याचे संपणे साजरे करावे तरी का वाटावे? 

काहीतरी संपले तरच नवे सुरू होईल हे माहीत आहे म्हणून? चालू असणारी घटना, परिस्थिती आवडीची नसेल तरच संपावी असे वाटतेच ना. त्यातही सुट्टी संपावी हे वाटणे अवघडच. पण ती संपतेच, समुद्रावरून उठून वाळू झटकावी लागतेच तीही व्यवस्थित नाहीतर पुन्हा आपल्यालाच गाडी व्हॅक्युम करणेही आलेच. 

वर्ष संपतेय, महीना संपतोय… कोणतीही गोष्ट संपतेय म्हटले की mixed feelings ठरलेलेच. मी वर्षांला- वर्षाने मला काय दिले काय घेतले हे व्यर्थ हिशेब सुरू होतील. प्रत्येक क्षण जिथे वेगळा आणि  निसटणारा  तिथे हिशेबातले क्षण वायाच नाही कां? त्यानिमित्ताने वळून पाहता येते, आठवणीनां उजाळा मिळतो. मान्यच पण त्या आठवणी तरी किती मोलाच्या ज्या आठवून आठवाव्या लागतात. मनात झिरपलेली तीही कळत नकळत,  आठवण कशाच्या तरी निमित्ताने लख्ख चमकते आणि त्या क्षणी ती पुर्वी घडून गेली हे आठवते तेवढे पुरे की. आठवावे- विसरावे लागणे तेही मुद्दाम तर त्याचा त्रासच. 

जाणिवेच्या पलीकडे, हिशेबात नसणारे, फोटोची क्लिक न उडालेले, मनातल्या मनातही न उच्चारले गेलेले जे काही कुठेतरी खोल दडून बसलेले असेल ते तिथेच राहू द्यावे. वाळूच्या असंख्य स्वच्छ कणांसारखे ते कशालाही न चिकटतां , पाण्याबरोबर प्रवास करतही किनारा न सोडतां तिथेच राहील जिथे होते, परत परत लाटेवर स्वार व्हायला.

मग ही सुंदर दुपार, ही सुट्टी, हा महीना हे वर्ष किंबहूना हे आयुष्य जरी संपले तरी तो शांत क्षण तो समुद्र ती आठवण तो जगण्याचा त्या क्षणाने केलेला उत्सव never ending आहेच आणि असेल.

पण जशी वाळू झटकत भानावर यावे लागते तसेच प्रथेला जागत कॅलेंडर बदलावेच लागेल आणि त्या आधी पुढील वर्ष आशा नाजूक क्षणांना अनुभवत आनंदात जावे हे त्या जाणार्या लाटेला स्मरून मनाला आणि सगळ्या सुह्रुदाना म्हणायचेच असते अगदी मनाच्या खोल तळापासून.

म्हणूनच wish you all a very happy new year!


                                                                                     -श्रुतकिर्ती

                                                                                ३१/१२/२०२२ 




याजसाटी केला होता अट्टाहास | शेवटचा दिस गोड व्हावा ||
आता निश्चिंतीने पावलो विसावा | खुंटलिया धांवा तृष्णेचिया ||
कवतुक वाटे जालिया वेचाचे | नाव मंगळाचे तेणे गुणे ||
तुका म्हणे मुक्ति परिणिली नोवरी | आता दिवस चारी खेळीमेळी ||
- संत तुकाराम




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान