शिवी

 

नेहमीच्या शॉपिंग सेंटरला दर शनिवार सकाळची नेहमीचीच गर्दी होती. गजबजाट होता, चेकआउटला रांगा होत्या . ट्रॉली, बास्केट्स कमी जास्त होत होत्या. मीही नेहमीप्रमाणेच त्या गजबजाटातल्या गर्दीचा भाग झाले आणि समोर बघून चालू लागले.

आम्ही तीन माणसे एकाच घरातली असलो तरी दारातल्या गर्दीत जरा पुढे मागे झालोच होतो. दारापाशी बॅंका चेक करणारी मुलगी, तिथेच बास्केट ठेवणारे आणि उचलणारे यामुळे गर्दीचा वेग अधिकच मंदावला होता. तसाच तो माझाही कमी झालाच होता.

पुढची व्यक्ती जरा थबकली आणि मी ही जागीच थांबले. एक पुरता क्षणही झाला नसेल याला आणि मागून “यु xxx इडियट! डोन्ट स्टॉप आय वॉन्ट टू वॅाक” अशी सणसणीत शेलकी शिवी आली.

अनेकदा ऐकलेला शब्द पण मला उद्देशून कोणीतरी आकारण म्हणल्यानंतर काय रिएक्शन द्यावी हेही कळले नाही. थांबलेल्या मला आणि पुढच्या एक दोन जणांना बाजूला सारत तो माणूस आणि त्याच्याबरोबरची बाई काहीच न झाल्यासारखेच गप्पा मारत पुढे निघून गेले.

मला मात्र सून्न करून गेले. चूक झाल्यावरही जे आपण कोणाला म्हणणार नाही ते तो अकारण मला बोलला आणि अंगावर पाल पडल्यासारखे वाटले. अशावेळी करायचे काय? आपण ही ओरडायचे? हे तेवढ्यात सुचते तरी का? तक्रार करायची ? मग ती कुणाची? आणि कुठे?

डोन्ट टेक इट पर्सनली “ असे सांगणार्याचे कळत होते, वळत पण होते. खरेदीतला उत्साह  मात्र थोडा तरी कमी झालाच. डोळे वस्तूंपेक्षा तो माणूस परत दिसतोय का यावरच जास्त फोकस्ड होते. “विसरून जा “ “तो कोणता तरी वेगळा राग काढत होता” हे सगळे कळून सवरूनही आश्चर्याचा धक्का पचायला थोडा वेळ लागला. त्याच्याबरोबरची ती बाई काही न घडल्यासारखीच मागच्या पानावरून पुढच्या वर बोलत होती. तिला रोजचेच होते का हे सगळे? परक्या माणसाला काही कारण नसताना शिव्या देणारा एरव्ही कसा वागत असेल? आजूबाजूच्यांना ते किती त्रासदायक होत असेल?

मनातले प्रश्न थांबत नव्हते. शिवी हा हिंसेचा अहिंसात्मक मार्ग आहे. रागाचा निचरा व्हायचे प्रभावी साधन आहे. भाषेचे काही प्रमाणात वैभव ही आहे . शेलक्या शिव्यांमध्ये जे सांगायचे ते पानभर बोलू नही प्रभाव पाडत नाही हे मान्यच आहे. पण अस्थानी उच्चारलेला तो शब्द माझ्या मनातला उत्साह, आनंद ढवळून गेला होता हे खरे,

टीव्हीवर, पुस्तकात, सिनेमात असंख्य वेळा ऐकलेला शब्द कोणीतरी आपल्याला म्हणते तेव्हा त्या शब्दांनी उमटणाऱा चरा पाहून गमतीत हे शब्द वापरणाऱ्यांच्या मनाचा बधिरपणा देखील जाणवला.

खरेदी संपली, दिवसही संपला. आता तो माणूसही मला नीटसा आठवत नाही पण तो शब्द आणि त्या भावना माझे समोरच्या व्यक्तींशी बोलणे मात्र कायमचे सुधरवून गेल्या.

- श्रुतकिर्ती

१९/०३/२०२३




Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान