तीतर के दो आगे तीतर…

काल सकाळच्या घाईत घराजवळच्या बागेपाशी, गाड्या हळू होत होत थांबल्या आणि काय झाले बघतानाच एका मागोमाग एक अशी बदकांची रांग फूटपाथ वरून बागेतील गवतात गायब झाली. वाहतूक सुरळीत झाली. 

पटकन मनात लहानपणचे ‘ एका बदका मागे एक बदक होते’ वाले कोडे आठवले. गणित अवघड वाटण्याच्या काळात ही असली कोडी अवघड वाटतातच, पण उत्तर शोधण्याच्या धडपडीत ते जमले की जगजेता आलेक्झांडर आणि मी यात मीच श्रेष्ठ वाले फिलिंग यायचे.

वय वाढले तशी समज वाढली आणि हे तर सोप्पे आहे पासून काय ही तिसरीतली कोडी! अशी तुच्छतेने बघण्याची वृत्तीही तयार झाली. 

हे कोडे अवघड वरून सोपे होण्याच्या काळात नवी नवी कोडी पडायला लागली होतीच. अवघड वाटत काही सोपी होत होती तर काही अवघडच बनवून राहिली. अवघड असतात म्हणजे ती सुटतच नाहीत असे नव्हते. वेळेनुसार, समजानुसार उत्तरे बदलत गेली.  आणि मग कोडे घालणाऱ्याने  ती चूक किंवा बरोबर ठरवली.

रांगेतली बदकं किती? हे शोधता शोधता ही बदकं कोठून आली? रांगेतच का आली? ती कशी दिसत आहेत? त्यांना जायचे कुठे? असे प्रश्न पडायचे ऐवजी कधी कधी नुसतीच त्यांची मोजणी करण्यातच कोडे सोडवायला दिलेली वेळ संपायला लागली. 

एखाद्या क्षणी ही मोजण्याची कटकट बाजूला पडून बदकांची रांग देखील धुसर व्हायला लागली. उत्तर शोधायची निकड संपली. ते बरोबर येण्याची गरजही संपली . प्रश्न विचारणार्याचे शब्दही ऐकू येत नव्हते, उत्तर द्यायला शब्दही फुटत नव्हते. सगळी कोडी सुटायची जाऊ द्या पडायची ही बंद झाली. 

बदलणाऱ्या कोड्यांच्या चूक बरोबर उत्तरे येण्याच्या या सगळ्या खेळात हा एकच क्षण खरा ठरला कारण…

कधीही विचारले तरी कोडेही तेच होते. बदकही तितकीच होती, उत्तरे मात्र माझीच बदलत गेली.

श्रुतकिर्ती

२६/०५/२०२३


तीतर के आगे दो तीतर 

तीतर के पीछे दो तीतर 

कविता ये प्राचीन है

इसका उत्तर अब भी तीन है।




Comments

  1. After a long time. Noice ♥️😃 I used to miss my Saturday morning reading 😌~ kalyani

    ReplyDelete
    Replies
    1. I missed my Friday night writing too😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान