शॅापिंग कार्ट

 


ॲानलाईन शॅापिंगच्या चकव्यामध्ये फिरतांना मधूनच ध्यानीमनी नसलेले काहीतरी दिसते आणि मग वाया घालवलेला वेळ इतकाही  काही वाया गेला नाही असे वाटू लागते.

असेच काल अचानक एका साईटवर किल्ल्यातले मावळे दिसले आणि काय भारी असे पटकन वाटले. ते प्रवास करून वेळेवर माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत, मिळाले तरी मी किल्ला कुठे करणार होते त्यांना मांडायला? असे सगळे असूनही पाच मिनिटे मज्जा वाटलीच.

किती विचित्रपणा मनाचा, कुंभारवाड्यातून असंख्यवेळा पाटीभर खेळणी आजूनही आज किती अप्रुप वाटले होते त्या मावळ्यांचे.

मग छंदच लागला, अशा सगळ्या गोष्टी बघत बसण्याचा. काय नव्हते त्यात? सगळी दिवाळी त्यात सामावलेली होती. जे जे मनात येत गेले ते कुठेतरी सापडतच होते. आणि जगाच्या पाठीवर कुठूनही कुठेही पोहचवणारे असंख्य होते.

त्या पाचदहा मिनिटांच्यां ब्राउझिंगने गेल्या सगळ्या वर्षातल्या दिवाळ्या डोळ्यांपुढे नाचवल्या. आणलेले, केलेले आकाशदिवे, पणत्या, रांगोळ्या, रंग, तेल साबण उटणे….बरं नुसतं साबण दिसत नसतंच मनाला, ते आठवले की अगदी तालासुरात मोती साबणाची जहीरात हटकून आठवतेच.रांगोळीबरोबर, उदबत्तीने भोक पाडलेला कागद आठवतोच आपसूक. तेल, उटणे दिसले की थंडी पहाट सगळे जाणवते.

ठराविक दुकान, त्याचा तो फुललेला रस्ता, पार बाहेर पर्यंत हारीने मांडलेल्या वस्तू सगळे काही अगदी या क्षणी घडणारे असते. भाजणीच्या पाकीटाकडे बघतांना खमंग वास नाकात शिरलाच, आणि खोटा मोगऱ्याचा गजरा एक क्षण मन गार करून गेला.

नव्या कपड्यांकडे बघतांना तर किती रंग आणि गंध आठवले त्याची मोजदादच नाही.

कोणी म्हणेल खरेदीचे काय कौतुक? दिवाळी म्हणजे काय नुसती खरेदी असते की काय? पण एक मात्र पक्के होते, डोळे बघत होते दिवाळीच्या वस्तू. मनाला मात्र दिसत होते प्रत्येक वस्तूला जोडले गेलेले दोन हात. त्या त्या हातांच्या चेहर्यांवरचा त्यावेळचा आनंद. त्या त्या व्यक्तीशी जोडले गेलेले माझे मन.

मला घ्यायचे तर काहीच नव्हते, माझी shopping cart रिकामीच होती पण या फेरफटक्यात आनंदाची, आठवणींची कार्ट गच्च भरली. इतकी की पुढची दिवाळी आली तरी शॅापिंगचे नावच नको.

-श्रुतकिर्ती

०३/११/२०२३



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान