दिवाळीची पणती

 

कॅलेंडर आले की, सणवार आणि विकएंड हे गणित मांडायला सुरुवात होते.  पुण्यात असताना सुट्टी बुडाल्याचे होणारे दुःख, इथे आनंदात रूपांतरित कधी झाले  ते कळलेच नाही.

यावर्षीही दिवाळीत शुक्रवार, शनिवार, रविवार आलेत आणि त्यातही भाकड दिवस आलाय म्हटल्यावर आनंदच आनंद. मग साधारण जूनच्या आसपास मित्रमंडळीत यावर्षी आमच्याकडे दिवाळी असे एक जण ठरवते, आणि सगळे लोक त्या दिवसाची वाट पाहायला लागतात.मेनू प्लान होतो. ठेवणीतले कपडे बाहेर निघतात. गिफ्ट्स आणल्या जातात आणि ज्याच्या घरी कार्यक्रम ते तर दोन वीकेंड आधीपासून, घरदार आवरावरी ते घर सजवणे या सगळ्यात बिझी होऊन जातात. मेसेजेस ना पूर येतो आणि ठरलेल्या दिवशी नटून थटून सगळे वेळेत पोहोचतात.

आठवणीने आणलेला फराळ, जेवायसाठी केलेले पदार्थ, दिवे,रांगोळ्या सगळ्याबरोबर उत्साहाने गप्पाच गप्पा रंगतात. खेळ होतात, टीम्स पडतात. लुटुपुटीची हार जीत होते. मेंदू खाजवत, चर्चा रंगत चहा पाण्यावर दिवसाची सांगता होते.

घरी परततानाचा प्रवास मजेशीर असतो. दिवसभरातल्या गमती जमती रंगवून रंगवून एकमेकांना सांगितल्या जातात. फोटो बघताना ते क्षण परत जगले जातात. मन पोट गच्च भरलेले असते.

शांतपणे तिन्हीसांजेला पणती लावताना, दिवसभरातल्या या सगळ्या आनंद देणाऱ्या जवळच्यांच्या आनंदासाठी हात जोडले जातात. उटणे,  फटाके, आईच्या  हातचा फराळ, रांगोळी या सगळ्या नॅास्टॅल्जियाच्या पलीकडेही दिवाळीतली एक वेगळी आठवण तयार झालेली असते. जवळच्या कुटुंबाच्या परिघाच्या पलीकडचे एक मैत्ररुपी परीघ विस्तारलेले असते.

मग दिवाळीच्या दिवशी एक नवी आनंदाची जबाबदारी वाढते, विस्तारलेल्या या परिघातल्या सगळ्यांना आधीच्या वर्तुळा इतकेच जपायची. तितकीच साथ द्यायची आणि पुढच्या प्रत्येक दिवाळीत त्यांच्याही आनंदाची मनापासून इच्छा करत एक पणती लावायची. त्या प्रकाशात सगळयांचे आयुष्य उजळू दे हेच मनोमन प्राथित, पुढच्या दिवाळीसाठी कॅलेंडरमध्ये तारीख शोधायलाही लागायची.

 ही दिवाळी माझ्यासारखीच सगळ्यांची आनंदात जावो. शुभदिपावली.

 

-श्रुतकिर्ती

१०/११/२०२३



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान