झाडे


जानेवारी आला आणि ॲास्ट्रेलियन ओपन सुरू झाली. वय वाढले की, रुटिनमधे गुंतत गेले की आणि आपले आवडते प्लेअर रिटायर झाले की खेळातील रस कमी होतो तसेच या गेम्सकडे दुर्लक्ष झाले होते. अचानक काल बातम्यांमध्ये जोकोविचच्या आवडत्या झाडाची बातमी झळकू लागली. मेलबर्नच्या बोटॅनिकल गार्डनमध्ये त्याचे एक लाडके झाड आहे. त्याला भेटून , त्याच्याशी बोलून “ He keeps himself grounded “ हे ऐकतांनाही भारी वाटत होते.

रोजच्या कामाच्या रस्त्यात खुप गर्द झाडी आहे. एक झाड जातानांची कितीही ही घाई  थांबवत एक क्षण तरी नजर फिरवायला भाग पाडतेच. जवळ जवळ शंभर एक वर्ष वयाची ती सगळी झाडे. चार सहा जणांनी हात पसरले तरी बुंधा मोठाच पडेल असे ते डेरेदार हिरवे झाड. गार्डनिंग ॲास्ट्रेलिया वाला कोस्टा जेंव्हा या रस्त्यावर आला होता, तेंव्हा या सगळ्या झाडांना त्याने मिठी मारली होती असे एका शो मध्ये म्हणाला होता.

काय मिळत असेल या सगळ्यांना  या अशा बुढेबाबा बरगद   टाईप झडांशी बोलून?

या झाडांच्या भोवती रेंगाळतांना जाणवते त्यांची समृध्दी, पानाफांद्यांमधून मिरवणारी श्रीमंती. जवळ गेले की वार्याच्या झुळकेने थरारणारी पाने आणि प्रेमाने जवळ येणाऱ्या फांद्या.वर्षानुवर्षांच्या खुणा मिरवणारी खोडे, बुंध्यातल्या ढोल्या आणि जमिनीत घट्ट रूजलेली मुळे.

पावसापाण्याने बहरणारी आणि पानझडीत सोशिकपणाने पाने गाळणारी झाडे. हातात हात घालून उभ्या असणार्या या झाडांखाली क्षणभरच जरी उभ राहीले तरी, न सांगताच मनातली सारी गुपिते  कळणार्या मित्रासारखी शांतपणे  बघत रहातात आणि पुढच्या वेळी लांबून गेले तरी ओळख ठेवून हसतात.

आणि मग आपल्या प्रवासात सहप्रवासी बनून जातात. यांच्या आसपास रोज वावरूनही, जगणे बर्याचदा सगळे माहीती असणारे विसरायला लावते मग असाच एखादा जोकोविच काहीतरी सांगतो  आणि एकेका झाडामाडाची रूपकळा बघण्यात, जाणण्यात रोजचाच साधा प्रवास लावण्याची जत्रा होवून जाते.

-श्रुतकिर्ती

१८-०१-२०२४


प्रति एक झाडामाडा

त्याची  त्याची रूपकळा

प्रति एक पानाफुला

त्याचा त्याचा तोंडवळा

- बा. भ. बोरकर



Comments

Popular posts from this blog

मागे वळून पाहतांना …

काहीतरी राहिलंय!

भान