ड्रीमकॅचर


सध्या इथे बुक विक चालू आहे. पुस्तके वाचणे, लिहिणे, लिहिणारे, त्यात चित्र काढणारे अशा सगळ्यांना साजरे करणारा आठवडा. लहान मुलांना डोळ्यापुढे ठेवून आखला असला तरी, त्या वातावरणात सगळेच ओढले जातात. गेला आठवडाभर रोज सकाळी रेडिओवर लेखकांशी गप्पा मारण्याचे कार्यक्रम चालू आहेत.

 ट्रॅफिक, रस्ता, डोक्यातले दिवसाचे विचार यातून कानावर पडणाऱ्यातले काही काहीच डोक्यात जाते. असेच एका लेखकाने दोन दिवसांपूर्वी “मी दिवसभर शांत बसून डे ड्रिमिंग करतो” असे म्हटले आणि मुलाखत घेणारी पटकन म्हणाली, “दिवास्वप्न बघणारी माणसे सगळ्यात हुशार असतात असं म्हणतात.” झाले, आपल्या कामाचे एक वाक्य मिळाल्यासारखे मी आता तेवढेच लक्षात ठेवले. बाकी मुलाखत केव्हाच विसरली.

ख्वाबिदा म्हणजे तरी काय वेगळे? उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्नेच की. स्वप्न बघायला कुणाची परवानगी लागत नाही आणि आता चार-पाच स्वप्न बघून टाकू म्हणून ती बघता ही येत नाहीत. त्यांना पाहिजे तेव्हा ती पडतात आणि त्यांना पाहिजे तशीच ती पडतात. चांगली-वाईट, छान -घाण, आनंदी कधी तर कधी भयंकर त्रासदायक, यावर कंट्रोल कोणाचा? स्वप्न फक्त बघणाऱ्याची असतात. त्यात कितीही सपोर्टिंग कॅरेक्टर्स असली तरी पण ती   त्यांच्या कॅरेक्टर प्रमाणे कुठे वागतात? स्वप्नात ती त्यांच्या मर्जीची मालक.


त्या लेखकाने कितीही दिवास्वप्ने बघितली असली तरी, ती लक्षात ठेवून, कागदावर उतरवून, त्यावर मेहनत करून सत्यात उतरवली होती. म्हणूनच आज मी त्याची मुलाखत ऐकत होते. मग माझ्या स्वप्नांचे काय करू?  ती येतात आणि जातात. बऱ्याचदा नको तीच लक्षात राहतात. या नको त्या लक्षात राहणाऱ्यांचीच मग भीती वाटते.  पूर्ण होतील का नाही? या शंकेतच मग स्वप्न बघण्यातली मजाच हरवून जाते. खूप स्वप्न बघायला पाहिजेत तरच काही प्रत्यक्षात येतील, हे माहीत असूनही जी खरी होणार नाहीत त्यांचीच काळजी जास्त वाटते. स्वप्नातील सहजताच नाहीशी होते.  आपली धाव कुंपणापर्यंतच मग जगाची बाग कुठे शोधा? या विचाराने आपलीच मर्यादा आपल्यावर लादली जाते. या सगळ्यात ती स्वप्ने,  ती दिवास्वप्ने बंद बाटलीच्या आत फसफसून बाहेर पडण्याची वाट बघत असतात.  आणि मनातला गोंधळ वाढवत राहतात.

 

या गोंधळात अचानक दुकानात दिसले ड्रीमकॅचर. त्याच्या सर्कल ऑफ लाइफ च्या जाळीमध्ये सगळी दुस्वप्न,  वाईट विचार अडकून ठेवणारं आणि मधल्या रिकाम्या वर्तुळातून फक्त चांगलेच तेवढे आज झिरपू देणारं. आता माझ्या मनातला ड्रीम कॅचर कुठे सापडणार?कोण कस्टमाईज्ड करून देणार? माझ्या लाखो दिवा स्वप्नांना फिल्टर करत माझी छोटी छोटी स्वप्न खरी करायला कोण साथ देणार?स्वप्न न बघायला कारणच मिळालं .

असा ड्रीमकॅचर  तयार नसतोच मुळी. तो कोणत्याच बाजारात मिळत नाही. तो आपल्या अवतीभवतीचा असतो चोविस तास. सगळ्या जवळच्या माणसांच्या रूपात. सगळ्या बिनकामाच्या, उगा त्रासाच्या, नको त्या कल्पनांना साथ देत त्यातून स्वप्नांना पुरे करायला त्यांनी लावलेल्या हातभाराच्या कड्यात.

कमतरता असली तर असते माझ्याच स्वप्न बघण्यात. माझ्या ड्रिमकॅचर वर विश्वास ठेवत, हिम्मत दाखवत ती सगळी दिवास्वप्न खरी करायच्या प्रयत्न करण्यात. 

 आता हे सत्य उमजल्यावर मग वाट कशाची पहायची? उघड्या डोळ्यांनी स्वप्न  पाहणारी माणसं खूप हुशार असतात हे पण कळलच आहे की आता. मग काय एक चहाचा कप, उन पडलेली हिवाळ्यातली दुपार आणि अंगणातला झोका ….स्वप्नांना आता काय तोटा.

श्रुतकिर्ती

२३/०८/२०२४



















Comments

Popular posts from this blog

विसर्जन

थांबा जरा !

नांव ठेवतांना