अवरग्लास


जून जुलै उजाडला की, डोळ्याचे पाते लावते न लावते तोवर सगळीकडे ख्रिसमस ट्री दिसायला लागतात.सणासुदीचे रंगांची उधळण करणार्‍या स्प्रिंग आणि मोठ्या होत जाणाऱ्या उन्हाळ्याचे दिवस झपाझप संपतात.

कॅलेंडरवरचे वीकेंड लाल, निळ्या, पिवळ्या आठवणींच्या नोंदींनी  भरून गेलेले असतात. साठवणीचे सणासुदीचे नवे आणलेले कपडे, गिफ्टचे- किराण्याचे शॉपिंग, भेटण्याच्या जाण्यायेण्याच्या तयार्या … भरगच्च कार्यक्रम ठरलेले असतात.  जोरदार गतीने आठवडे पुढे जात असतात. कधी कधी मधेच थकून जायला ही होते.  आता पुरे! शांत बसुया दोन आठवडे , असे म्हणत असतानाच मनात मात्र पुढचे प्लॅन तयार होत असतात. 

वेळ सारखाच पुरा पडत असतो. वेळ पुरत नाही ची तक्रार करत असतानाच, एक बंगाली गाणं ऐकण्यात आले. 

“एकूल भांगे, ओकुल गोरे

  ए तो नादिर खेला

सकाल बेलार आमिर रे भाई 

फोकीर संध्या बेला 

ए तो नादिर खेला “

एका किनाऱ्याला खणून त्याचे इरोजन करून दुसरीकडे गाळ भरणे,  सुपीक करणे , समृद्धी आणणे हा तर नदीचा खेळ आणि सततचा खेळ. हे ऐकले आणि मग मनातील तक्रारच गायब झाली.


कामाची गडबड, आवराआवरी, प्रवासातला ट्रॅफिक, डोक्यातली शंभरशेसाठ रिमाइंडर्स या सगळ्याचा गुंता एकदमच सुटला.  माझ्या वाळूच्या घड्याळातले हेच तर  सगळे निसटणारे कण असतात ज्यांचा त्रास होत होता.  आता जरा नजर बदलली होती. याच वाळूच्या घड्याळाला खालची आणखीन एक बाजू असते हेही दिसले होते. जवळच्यांच्या भेटी, खाण्यातला खिलवण्यातला आनंद, रस्त्यांच्या सगळ्या कडांना उधळलेली  थोडेच दिवस टिकणारी रंगांची उधळण, दिवस संपला तरी न संपणारा सूर्यप्रकाश; सगळे खालच्या गोलात साठत होते. 

मनाचा मेंदूचा एक कप्पा हे सगळे मिळवण्यासाठी वेळ एनर्जी खर्च करत होता ,श्रम करत होता तर दुसरा त्यातूनच समृद्ध होत चालला होता. पुढच्या वर्षी हेच दिवस येईपर्यंतची बेगमी करत होता.


सरळ चालणारे सैनिकांच्या मार्च सारखे Monday to Friday आनंदात घालवायला  आणि सोमवारी सकाळी सकाळी “स्प्रिंग इन माय स्टेप” मिळवण्यासाठी हा वळणावळणाचा डीटूअर  घ्यावाच लागतो हे जाणवले.चोवीस तासाच्या घड्याळ्यातला मिनिटांचा हिशोब ठेवण्या ऐवजी त्याचा उत्सव करावासा वाटला आणि वाळूचे घड्याळ पुन्हा उलटे करण्याआधी हात एक क्षण थबकला.

- श्रुतकिर्ती

- ⁠२५/१०/२०२४






Comments

Popular posts from this blog

विसर्जन

थांबा जरा !

नांव ठेवतांना