रांग
काल सिडनीच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये Putricia ,the putrid corpse flower म्हणजे कुजलेल्या मांसा सारखा वास पसरवणारे पंधरा वर्षांनी फुलणारे फुल फुलले. चोविस तास जेमतेम टिकणारे ते फुल बघायला हजारो लोक विशेषतः छोटी मुले रांगा लावून जमले. यात भर म्हणजे या फुलाच्या फुलण्याचे एक आठवडा आधीपासून लाईव्ह स्ट्रीम चालू होते. हजारो लोक ते सारखे बघत होते, “फुल फुलले का नाही? “ ट्रेंडींग होते. लाईव्ह स्ट्रीम चेक करत राहणे हेही रांगेत उभे राहण्यासारखेच की.
हे सगळे वाचताना ऐकताना डोळ्यापुढे कितीतरी रांगा आल्या. काही ताटकळत उभे राहून अनुभवलेल्या, काही टाळलेल्या तर काहींमध्ये उभे असण्याची मजा आजही आठवते अशा.
आजच लॉंग वीकेंड सुरू होईल आणि मोटर वेवर गाड्यांच्या रांगा लागतील. मग त्या पुढे चालूच राहतील. प्रेक्षणीय स्थळे खाण्यापिण्याच्या ठिकाणी आणि सगळीकडे.
शाळेत रांगेत बसणे आणि उभे राहणे यातून शिकलेली रांग नंतर कधीच पाठ सोडत नाही. फक्त रांगेत उभे राहतांना त्या रांगेचा शेवट होऊन आपल्या हाती काय पडणार यावर त्या आवडतात का नावडतात हे ठरते. मॅच, सिनेमा, नाटक, कॉन्सर्ट यांना जाताना रांगेत फार उत्साह असतो पण शेवटी रांगेत गर्दीत अडकायला नको म्हणून पाच मिनिटे आधीच निघू असे जवळजवळ प्रत्येकाच्या मनात येते.
लहानपणी मुंग्यांच्या रांगा बघणे हा प्रत्येकाने कधी न कधी नक्कीच केलेला उद्योग.शाळेच्या बसची रांग प्रत्यक्षा पेक्षा आठवणितच चांगली असते.बिलांच्या रांगा आता फक्त मागच्या पिढीच्या आठवणीत आहेत. तसेच सगळी तिकिटे काढायला लागणाऱ्या रांगा देखील इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.
रांगा कंटाळवाण्या होतात म्हणून तर त्या मोडणारे, घुसणारे ,ओळख काढत एकदम पुढची जागा मिळवणारे निघतात. कशाच्याही दर्शनासाठी रांगा हे तर सगळीकडचे दृश्य. बऱ्याच ठिकाणी सोय तर काही ठिकाणी अत्यंत गैरसोय. उपाय, पळवाट शोधण्याची माणसाची प्रवृत्ती अशावेळी कामी येते. कळस दर्शन घेऊन परत जाणाऱ्या वारकऱ्यांपासून ते हजारो रुपये देऊन व्हीआयपी दर्शनाचे मग पर्याय निघतात.
सिक्युरिटी चेकच्या रांगे इतके कंटाळवाणे काही नाही. त्या चौकटीतून पार होईपर्यंत उगाच मनात धाकधूक. काही न करता देखील आपल्याच वेळी बीप वाजण्याची कमाल देखील याच रांगेत घडते.
गोष्टी सुरळीत घडायला, शिस्तीत व्यवस्थित व्हायला रांगांना पर्याय नाही. मग त्या मुंग्यांच्या असो नाहीतर लेन एक्झिट करणाऱ्या गाड्यांच्या. तरीही युद्धाची दृश्य दाखवताना च्या विस्थापितांच्या रांगा, कोविड काळातल्या एक हात अंतर ठेवून केलेल्या रांगा या मनाला उदास करतातच.
रांग लावावी लागणार हे कळले की डोक्यात थोड्याशा नकारात्मक भावना येतात आणि मग जाणवते या मेंदूतही तर विचारांच्या रांगाच रांगा आहेत. असंख्य विचार डोक्यात मनात कधीही येतात आणि जातात. आधीचा कोणता तरी विचार रांगेत उभा आहे, त्याचे काम चालू आहे याची परवा न करता, मध्ये मध्ये घुसत राहतात. कधी कधी काही विचार मनात येतात आणि इतर विचारांची मोठी रांग बघून आल्या पावली निघूनही जातात.
सुजाण नागरिक म्हणून रांग मोडण्याचे टाळणे आपण स्वतःत कष्टाने रुजवतो. या मेंदूतील विचारांना मात्र हे रांगेत उभे राहणे आणि आपली टर्न येईपर्यंत लुडबुड न करणे हे शिकवलेच पाहिजे. म्हणजे त्यांचाही ट्रॅफिक सुरळीत होईल. आणि पांडुरंगाच्या दर्शनासाठी उभा वारकरी जसा त्यात समचरणांवर फोकस्ड असतो तसेच काहीतरी आपल्यालाही जमेल.
-श्रुतकिर्ती
-२४/०१/२०२५
Comments
Post a Comment