झळ

रोजचा दिवस नवीन बातमी घेऊन उजाडतोय. खरे म्हणाल तर जुनीच बातमी अजून त्रासदायक करून दाखवतोय. कितीही असंवेदनशील असलेले मन सुद्धा याकडे तटस्थपणे बघू शकणार नाही. रोजच्या जगण्यात दुःख हे असतेच एक हिस्सा म्हणून , सध्याच्या प्रसंगापेक्षाही वाईट प्रसंग येऊन गेलेले असतात वैयक्तिक आयुष्यात. मग याच वेळी याचे परिणाम इतके खोल का होताहेत ? आजूबाजूला कोणी गेले , गंभीर आहे कळले कि त्याचा परिणाम इतका जास्त का होतोय ? एकदा वाटले कि दुःखाने इतकी समोरून धडक दिलीच न्हवती कां कधी ? तर हो खरंच खूप फिल्टर्स होते मध्ये , अगदी लहानपणी कुणी वारले कि , बातमी अती सौम्य होऊन मिळायची. बहुदा आईबाबा , आजी आजोबा कुणाच्यातरी घरी जाऊन आलेत. तिथे काहीतरी वाईट घडलेय एवढेच कळायचे. मग कधीतरी मृत्यू हि संकल्पना कळली. जवळचे , नात्यातले ,extended family मधले कोणी गेले तरी आई बाबा होते बरोबर धीर द्यायला. दुःखाची तीव्रता कमी करायला. जे झाले ते अपरिहार्य होते. काळापुढे कोणाचे काय चालते इत्यादी सौम्यपणे समजावत. या सगळ्याची झळ कमी करायला. हळूहळू हे समजावून सांगायची गरज कमी होत गेली. दुसऱ्याला तर कधी स्वतःला धीर देण...