Posts

कंटाळा

Image
वादळ येणार करत करत, हुलकावण्या देत, काळजी, चिंता वाढवत,  आले आणि गेले. नुकसान, त्रास आणि आवरायला खूप पसारा मागे ठेवून गेले.  काहींना जन्मभराची आठवण तर काहींना चर्चेला गोष्टी देऊन गेले.  त्याआधीची तयारी,  नंतरची आवरावरी यात वादळाची गती मंदावल्याने भरपूर दिवसाची गॅप होती. जी बऱ्याचदा काही तासांचीच असते,  त्यामुळे हाताशी वेळही भरपूर होता. अगदी काळजीतून कंटाळ्याकडे जाण्या एवढा. तसाही कंटाळा इतर कशाहीपेक्षा पटकन जाणवणारी भावना.  त्यामुळे सायक्लॅानची वाट पाहत असताना, आता काय करू? असे अनेकांप्रमाणे माझेही झाले.  अशा वेळी रिकामा मेंदू आणि विविध चविंची सवय झालेली जीभ,  तयारी म्हणून भरून ठेवलेला भरपूर किराणा आणि हाताशी अगदी फिंगर टीप वर अवेलेबल असणाऱ्या असंख्य रेसिपी.त्यामुळे फुड ब्लॉग्स वाचणे, व्हिडिओ बघणे आणि  काहीतरी वेगळे खायला करणे हे पर्याय मेंदू पटकन स्वीकारतो.  बाहेरची परिस्थिती जोपर्यंत आपल्या गळ्याशी येत नाहीये तोवर जेवायला तर लागणारच ना. मग त्यातल्या त्यात तोच विरंगुळा,  तेच डिस्ट्रॅक्शन.  असे म्हणत काहीतरी नवीन केले जात होते....

रांग

Image
काल सिडनीच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये Putricia ,the putrid corpse flower म्हणजे कुजलेल्या मांसा सारखा वास पसरवणारे पंधरा वर्षांनी फुलणारे फुल फुलले. चोविस तास जेमतेम टिकणारे ते फुल बघायला हजारो लोक विशेषतः छोटी मुले रांगा लावून जमले. यात भर म्हणजे या फुलाच्या फुलण्याचे एक आठवडा आधीपासून लाईव्ह स्ट्रीम चालू होते. हजारो लोक ते सारखे बघत होते,  “फुल फुलले का नाही? “ ट्रेंडींग होते. लाईव्ह स्ट्रीम चेक करत राहणे हेही रांगेत उभे राहण्यासारखेच की.  हे सगळे वाचताना ऐकताना डोळ्यापुढे कितीतरी रांगा आल्या. काही ताटकळत उभे राहून अनुभवलेल्या,  काही टाळलेल्या तर काहींमध्ये उभे असण्याची मजा आजही आठवते अशा. आजच लॉंग वीकेंड  सुरू होईल आणि मोटर वेवर गाड्यांच्या रांगा लागतील. मग त्या पुढे चालूच राहतील.  प्रेक्षणीय स्थळे खाण्यापिण्याच्या ठिकाणी आणि सगळीकडे. शाळेत रांगेत बसणे आणि उभे राहणे यातून शिकलेली रांग नंतर कधीच पाठ सोडत नाही. फक्त रांगेत उभे राहतांना त्या रांगेचा शेवट होऊन आपल्या हाती काय पडणार यावर त्या आवडतात का  नावडतात हे ठरते.  मॅच,  सिनेमा, नाटक, कॉन्सर्ट य...

पॉज

Image
किती वेळची नुसतीच बसली आहेस , काही काम नाहीये का आज ? या वाक्यानंतर जाणवते ,   किती वेळ गेला असेल या स्तब्धतेत. शांततेत. काहीच न करण्यात. पण खरंच काही केलेच नव्हते का त्या वेळात मी ? तो होता दोन कामातला पॅाज. वरवर शांत , स्तब्ध , स्थिर असलेल्या या मनाचा तळ   अशावेळी किती खळखळत असतो ते त्या समोरच्याला काय दिसणार ?   त्यातल्या त्यात चित्रकाराला , संगीतकाराला , थोडक्यात आधी मेंदूत काहीतरी शिजवून मग प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येकाला या वेळेचे महत्त्व असतेच. त्या सगळ्यांचा भरपूर   वेळ जगाच्या दृष्टीने काही न करण्यातच जातो.   पण त्या शांततेतूनच , पॅाज मधूनच जगातल्या सगळ्या भावनांची हालचाल घडवणार्या कलाकृती तयार होतात. तरीही काहीतरी कर , रिकामे बसू नको हे आपणच आपल्या मेंदूला लावलेले टुमणे आपण सोडत नाही. शांत बसले   की , स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले की मग सगळे चित्र स्पष्ट दिसते. उत्तरे सापडतात , प्रश्न सुटतात , पण तो पॉज घेण्याचा वेळ दिला तर पाहिजे ना मेंदूला. नुसत्या टू डू लिस्ट   टिक ऑफ करून दिवस संपवण्यात काय मजा ? सोमवारी शुक्रवारची वाट पा...

पद्धत

Image
घरोघरी ख्रिसमस ट्री सजवले जावू लागले की मला एक घटना कायम आठवते.   बऱ्याच वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी नोव्हेंबर आल्यावर ; सुट्ट्या , ख्रिसमस , सेलिब्रेशन हे नेहमीच यशस्वी विषय चर्चेत चालू होते. एक जण तिच्या ,   विविध प्रकारच्या काचेच्या , लाकडी , कापडी ऑर्नामेंट्सने नटलेल्या भरगच्च झाडाचे फोटो दाखवत होती. झाड सुंदर दिसत होते आणि शेजारीच फोटोत मोठ्या दोन बॉक्सेस आणि सगळी ऑर्नामेंट्स जपून ठेवायला लागणारे पॅकिंगचे सामान दिसत होते. मेहनत खूप लागत असणार हे कळून येत होते. सहजच किती छान आहे हे सगळे. कसे जमवले ? हे विचारल्यावर लकाकलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली , “ हा ख्रिसमस ट्री माझ्या मोठ्या मुलीच्या पहिल्या ख्रिसमसला घेतलाय आणि दरवर्षी मी घरातल्या प्रत्येकाच्या नावाने एक डेकोरेशन घेते ही आमच्या घरची मी सुरू केलेली ट्रॅडिशन आहे. I will pass this to my daughters and they can add something new every year to make it   their own.” इतका वेळ भारी वाटणारे फिलिंग , मी पुढे हे कुणाला तरी देणार चालू ठेवायला इथे येऊन ठेचकाळले. तिला काहीतरी स्वतःसाठी करावे वाटले , सजवणे खरेदी करणे नंतर...

अवरग्लास

Image
जून जुलै उजाडला की, डोळ्याचे पाते लावते न लावते तोवर सगळीकडे ख्रिसमस ट्री दिसायला लागतात.सणासुदीचे रंगांची उधळण करणार्‍या स्प्रिंग आणि मोठ्या होत जाणाऱ्या उन्हाळ्याचे दिवस झपाझप संपतात. कॅलेंडरवरचे वीकेंड लाल, निळ्या, पिवळ्या आठवणींच्या नोंदींनी  भरून गेलेले असतात. साठवणीचे सणासुदीचे नवे आणलेले कपडे, गिफ्टचे- किराण्याचे शॉपिंग, भेटण्याच्या जाण्यायेण्याच्या तयार्या … भरगच्च कार्यक्रम ठरलेले असतात.  जोरदार गतीने आठवडे पुढे जात असतात. कधी कधी मधेच थकून जायला ही होते.  आता पुरे! शांत बसुया दोन आठवडे , असे म्हणत असतानाच मनात मात्र पुढचे प्लॅन तयार होत असतात.  वेळ सारखाच  आ पुरा पडत असतो. वेळ पुरत नाही ची तक्रार करत असतानाच, एक बंगाली गाणं ऐकण्यात आले.  “एकूल भांगे, ओकुल गोरे   ए तो नादिर खेला सकाल बेलार आमिर रे भाई  फोकीर संध्या बेला  ए तो नादिर खेला “ एका किनाऱ्याला खणून त्याचे इरोजन करून दुसरीकडे गाळ भरणे,  सुपीक करणे , समृद्धी आणणे हा तर नदीचा खेळ आणि सततचा खेळ. हे ऐकले आणि मग मनातील तक्रारच गायब झाली. कामाची गडबड, आवराआवरी, प्रवासातला ट्र...

विसर्जन

Image
  सालाबाद प्रमाणे गौरी गणपती आले. आनंद वाटून परत निघाले. विसर्जनाचे दुःख कायमच असते,  ते यावेळी जरा जास्तच वाटले. कारण होते गौरींचे नवे मुखवटे. 22 -23 वर्षानंतर गौरीचे नवे मुखवटे यंदा आणले. आणायचे ठरवल्यापासूनच नवे कसे आणायचे आणि त्याहीपेक्षा कसे नकोत याच्या चर्चांना उत आला. घरातल्या प्रत्येकाच्या मनातल्या आणि डोळे मिटल्यावर डोळ्यापुढे दिसणाऱ्या आमच्या महालक्ष्म्या बदलून आता नवे रूप डोळ्यात साठवायचे होते. तो विचार मनाला जडच जात होता.  पुण्याच्या बाजारपेठा जून पासूनच विविध मुखवट्यांनी फुलून गेल्या, हे इथे बसून व्हिडिओ पाहून कळत होतेच. त्यांच्यातही विविध फॅशन ट्रेंड आहेत हेही जाणवले होते. इतक्या वर्षात घाट, वळण, मटेरियल बदलणार हे कळत होते पण वळत नव्हते. सगळेच मुखवटे एकाहून एक सरस. आपल्या गौरी म्हणून घरी कोणाला आणणार?  आणायला जाणार्याचा कस लागणार होता. ढोबळ मानाने रंग, डोळे, केसाची ठेवण, दागिने घातलेले, का न घातलेले?कुंकू गोल का चंद्रकोर?  असे सगळे ठरवले गेले. पण एवढ्या सगळ्या चेहऱ्यात आपले आधीचे मुखवटेच शोधणे सारखे चालू होते.  दुकानातून फोटो,  व्हिडिओ कॉ...

गणपती आले

Image
गणपती आले की, मूर्ति हा  सगळ्यांच्याच सगळ्यात आवडीचा मुद्दा असतो. रंग, रूप ,आकार ,प्रकार, प्रचंड विविधता आणि मग चॉईस ला खूप वाव. प्रत्येकाची आवड वेगवेगळी साहजिकच त्यामुळे मिळणारे प्रकारही विविध. नाचणारा, कोणत्यातरी असुराचा वध करणारा, शंकर-पार्वती बरोबरचा, मोरपीस वाला कितीतरी. विविध वाद्ये वाजविणार्या, लिहणार्या, वाचणार्या  मूर्ती पाहून तर नजर हटत नाही. लहानपणापासून, बाबांबरोबर मूर्ती बुक करायला जातानां आपल्या घरची मूर्ती सुखासनातील, आशीर्वाद देणारी, चारही हात सुट्टे असणारीच असणार हे माहीत असले तरी या वेगवेगळ्या मूर्ती बघायचा उत्साह काही कमी व्हायचा नाही. त्यातल्या त्यात बदल म्हणजे कद कोणत्या रंगाचा आणि शेला कोणत्या रंगाचा. सोंडेवरची नक्षी दगडूशेठ गणपती सारखी का वेगळी? हे छोटे बदल देखील,  वेगळीच आहे या वेळची मूर्ती असे जाहीर करायला बळ द्यायचे. पार्थिव मूर्ती त्या दुकानात हारीने मांडल्या की वेगळ्या दिसतात.  घरी आल्या की वेगळ्याच भसतात. प्रतिष्ठापना केली की देव बनतात आणि पुनरागमनायच् च्या  अक्षता पडल्या  कि उदास करतात.  मग येतो विसर्जनाचा नकोसा भाग आणि उर...

नांव ठेवतांना

Image
एका व्हिडीओमध्ये नुकत्याच जन्मलेल्या तीन गिनीपिग्जची नावे ठेवायला मदत करा असे त्यांची मालकिण सांगत होती आणि नावांचा पाउस कमेंट्समध्ये पडत होता. त्या एक दिवसाच्या पिल्लांकडे बघून कुणाला एक वाटत होते तर कुणाला दुसरेच. रंग, रूप, attitude, आकार आवाज असे सगळे पाहून मजेमजेशीर नावे समोर येत होती. नांवे काय ठरली ते नंतरच्या व्हिडीओत कळणार होते पण ती ठरवण्याची पध्दत मजेशीर होती. मग मनात आले, प्रत्येक गोष्टीला निदान एक नांव आहे. कसे ठेवले गेले ते? कुणी ठेवले? कां? आणि मुख्य म्हणजे तेच कां? अगदी लहानपणी प्रश्न पडतो.. टेबलाला टेबलच  का म्हणायचे तसे. प्रत्येक शब्दाला, नावाला काहीतरी उगम असतो. कोणत्यातरी भाषेतले काहीतरी मुळ रूप असते बरा वाईट अर्थ असतो . प्रत्येक नावाची प्रचलित नावापर्यंत येवून पोचण्याची कथा वेगळीच असते. ती कळली की सगळे कोजे सुटल्यासारखे वाटते.  नावात काय असे कितीही म्हटले तरी नावातच सगळे दडलेले असते. सिकंदर म्हटला की घोडाच डोळ्यापुढे येतो मांजर नाही. मांजराला ते नांव ठेवायला काही हरकत नाही पण एखादे सिकंदर मांजर भेटेपर्यंत डोळ्यापुढे मांजर काही येतच नाही. माणसांचेही असेच होत...

ड्रीमकॅचर

Image
सध्या इथे बुक विक चालू आहे. पुस्तके वाचणे, लिहिणे, लिहिणारे, त्यात चित्र काढणारे अशा सगळ्यांना साजरे करणारा आठवडा. लहान मुलांना डोळ्यापुढे ठेवून आखला असला तरी, त्या वातावरणात सगळेच ओढले जातात. गेला आठवडाभर रोज सकाळी रेडिओवर लेखकांशी गप्पा मारण्याचे कार्यक्रम चालू आहेत.  ट्रॅफिक, रस्ता, डोक्यातले दिवसाचे विचार यातून कानावर पडणाऱ्यातले काही काहीच डोक्यात जाते. असेच एका लेखकाने दोन दिवसांपूर्वी “मी दिवसभर शांत बसून डे ड्रिमिंग करतो” असे म्हटले आणि मुलाखत घेणारी पटकन म्हणाली, “दिवास्वप्न बघणारी माणसे सगळ्यात हुशार असतात असं म्हणतात.” झाले, आपल्या कामाचे एक वाक्य मिळाल्यासारखे मी आता तेवढेच लक्षात ठेवले. बाकी मुलाखत केव्हाच विसरली. ख्वाबिदा म्हणजे तरी काय वेगळे? उघड्या डोळ्यांनी बघितलेली स्वप्नेच की. स्वप्न बघायला कुणाची परवानगी लागत नाही आणि आता चार-पाच स्वप्न बघून टाकू म्हणून ती बघता ही येत नाहीत. त्यांना पाहिजे तेव्हा ती पडतात आणि त्यांना पाहिजे तशीच ती पडतात. चांगली-वाईट, छान -घाण, आनंदी कधी तर कधी भयंकर त्रासदायक, यावर कंट्रोल कोणाचा? स्वप्न फक्त बघणाऱ्याची असतात. त्यात कितीही सपोर...

स्पर्श

Image
थंडीच्या दिवसात गुरफटून बसावे वाटतानाच, सकाळी सकाळी ऊनही खुणावते. आणि एकदा का उन्हात गेले की मग तिथेच बसावे वाटायला लागते. असेच दोन-तीन दिवसापूर्वी ऊन पडले. उन्हात बसायला कारण म्हणून घरातल्या, दारातल्या कुंड्यांच्या आजूबाजूला रिकामे उद्योग काढले गेले.  पहिलीच कुंडी उचलली. तिच्या बाहेरची शोभेची कुंडी आणि झाडाची कुंडी यांच्या मधल्या फटीतून पालीचे छोटेसे   पिल्लू सुरकन बाहेर आले. काय करावे ते न कळल्यासारखे पुन्हा आत गायब झाले. आता कुंडी खाली ठेवता येईना, ते चिरडले गेले तर! पण उचलून बाहेर काढू आणि अंगावर आले तर!  शेवटी मनाचा हिय्या करून छोटी कुंडी उचलली आणि अपेक्षित असल्यासारखे ते हातावर आले. ओरडून उपयोग नसल्याने मनातच किंचाळून हात झटकला.  पिलू पळाले.  त्याचा आकार तो कितीसा , माझा तो केवढा …माझ्या हातात जड कुंडी, बाहेरचा उजेड, सूर्यप्रकाश, त्याला भीती वाटणारे अनेक फॅक्टर पण घाबरले होते मी.  घाबरण्यापेक्षा तो स्पर्श नकोसा होता. काहीतरी किळसवाणे, शिसारी वाटणारे होते त्यात.  कुंडी जागेवर ठेवली. उनबीन विसरून घरात जाऊन हात धुतले. पुन्हा हात धुतले. पुन...