Posts

पोर्ट की

Image
थंडीने हळूहळू काढता पाय घ्यायला सुरुवात केलीय आणि उबदार ऊन जाणवायला लागलेय. हे भल्या पहाटे दुलईत गुरफटणाऱ्या आपल्यापेक्षा झाडापानांना आधी  कळते. थंडीने मरगळलेले करडे , राखाडी झालेले त्यांचे जग , पोपटी-हिरवे होता होताच सगळीकडे फुलांचे बहर दिसायला लागलेही. काही काही फुलांचे वास आधी जाणवतात तर काही माझ्याकडे न पाहता पुढेच कसे जाल ? हे सांगायला पानोपानी फुलून अस्तित्व दाखवून देतात. या सगळ्यातून स्प्रिंग आलाय , उन्हाळा आता दूर नाही हे कळलेले असतेच. माझ्या रोजच्या जाण्याच्या रस्त्यावर , भले थोरले चार माणसांना मिळूनही कवेत न घेता येण्यासारखे अनेक हिरवेगार वृक्ष आहेत. तिथून जाताना काल अचानक वार्याच्या झुळुकीबरोबर एक मंद सुवास आला. आणि मान वर करायचे कष्टही न घेता त्या चार-पाच झाडातले आंब्याचे झाड कोणते हे कळले होते. ते पानोपानी मोहरले होते. उन्हाळा आला , कैर्या , पन्हे , लोणचे , रस आम्रखंड   आंबा बर्फी , आईस्क्रीम , मस्तानी… क्षणार्धात तीनशेसाठ डिग्री चा प्रवास जिभेने केला. पुढची पाच सात मिनिटे , आंबा या एका शब्दाने जुन्या नव्या आठवणींच्या जगात भिरीभिरी फिरवून आणले.   किती...

धडपडणे…

Image
कपाट उघडून कप्प्यातून काहीतरी काढले आणि डोके वर केले मात्र , ठण्ण्… वरच्या कपाटाचे दार उघडेच ठेवले होते. चांगलेच डोके आपटले. विचार केला तर गेल्या आठवड्यात दोन-तीनदा डोकेच आपट ,   ठेचच लाग असं झालेले होतेच आणि जाणवले आपण बर्याचदा धडपडतोय.   वरचे कपाट उघडले आहे माहीत असूनही डोके वर केलेच कसे जाते ?   हे कोडे काही सुटेना.   रोज ज्या   दारातून शंभर वेळा जातो त्याच्यात पाय अडखळतोच कसा ? दाराला हँडल असताना वेगळीकडेच धरून हात चेमटतोच कसा ? बरंही आपटापटी होवून भागत नाही. मग सुरू होते कसे झाले ? काय झाले ? ची कथा. जखम टेंगूळ   दिसणारे असले   की मग तर विचारू नका. भेटणारा प्रत्येक जण विचारणारच आणि मग त्यावर , “ हळूच काम करत जा” , “ लक्ष कुठे असते ?” “ एकावेळी एकच गोष्ट करावी” असे समोरच्याच्या नात्यावर आणि स्वभावावर अवलंबून असलेले रिप्लाय वजा सल्ले , अर्थात चांगलेच पण येतात मात्र खरे. कुठून आपटलो असे वाटयला लावतातही ते. त्यातच एखादा वयाने आणि अधिकाराने मोठा आवाज “वेंधळेपणा नको करत जाऊ” म्हणतो मात्र… आणि डोक्यात चक्र फिरायला लागते नक्की काय होते ?   म...

गणपती आला न्…

Image
  नव्या वर्षाच्या नव्या कॅलेंडर मध्ये , भराभरा पाने उलटत गणेश चतुर्थी , दसरा आणि दिवाळीची तारीख बघायचीच असते. जोडून सुट्टी आली आहे कां ? दहा दिवसांचा का अकरा दिवसांचा गणपती आहे हे बघताना , गणपतीचे वेध लागलेले असतात.   यावर्षीही असंच झालं आणि यथावकाश वाजत गाजत गणपती आले. ‘पहिले नमन ‘ म्हणत ज्याच्यामुळे सगळ्याची सुरुवात होते त्याच्या पूजेची , सजावटीची , प्रसादाची तयारीही उत्साहात चालूच होती . आजूबाजूचे वातावरणही अगदी नेहमीसारखेच गणपतीमय झाले होते. उत्साहात ,   धामधुमीत सुरू झालेला हा सोहळा एक दिवसाचा , दीड दिवसाचा , पाच दिवसाचा असे करत करत अनंतचतुर्दशीला येऊन पोहोचला. आला आला म्हणताना , गणपती विसर्जनाचा सोहळा पार पडला.   मागची आवरावरी करताना डोळ्यापुढे मनात बरंच काही येत राहीले.   यावर्षी डेकोरेशन काय करायचे याच्या डायनिंग टेबलवर घडणाऱ्या चर्चा.   रंगसंगती , नक्षी यावरचे लुटुपुटूचे वाद , त्यानंतर रोजची कामे आटोपल्यावरची छोटी छोटी तयारी.   खरेदी , आवराआवरी आमंत्रणे , एक ना दोन. एक सण साजरा करण्यामागे कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी. मग सगळ्याचा शेवट ...

कहानी पोटली बाबा की!

Image
  गेल्या आठवड्यात माझ्या ओळखीच्या एका शिकाऊ ड्रायव्हरला सिग्नल ला शांतपणे उभे असताना मागून येऊन एकाने धडक दिली. सुदैवाने कोणालाही काही झाले नाही. गाड्यांचे नुकसानही झाले नाही. हे सगळे ऐकल्यावर “ चला बरे झाले काही वाईट झाले नाही”  असे आपसूकच तोंडून निघाले. पण शिकवू ड्रायव्हर पटकन म्हणाला " Now I have a car crash story to share, my first crash story" फार मजा वाटली. खरच किती गोष्टी वेल्हाळ आहोत आपण . सगळ्याची   एक गोष्ट असते.   लहानपणी चिऊ काऊ करत सुरू झालेल्या गोष्टी अशा रोजच्या अनुभवांपर्यंत येऊन पोहोचतात. मनोरंजनाचे पहिले साधन जे आपल्याला कळते तेच असते गोष्ट ऐकणे आणि गोष्ट सांगणे.   नुसत्या कल्पना , मग त्या कल्पनांमध्ये अनुभव ,   कधी एखादा सहज न पचनी पडणार सल्ला. या सगळ्याचे मिश्रण करून तयार होणाऱ्या गोष्टी तर महत्त्वाच्याच पण त्याहीपेक्षा रंजकदार पद्धतीने त्या सांगणारा महत्त्वाचा.   सांगणारा गोष्टीची मजा वाढवतो किंवा घालवतो.   आई बाबा ,   आजी आजोबा यांच्या मांडीवर डोके ठेवून गोष्ट ऐकताना गोष्टी इतकेच त्या सांगणाऱ्याच्या आवाजाने ,   अव...

गोपाळकाला

Image
  फिरून फिरून भोपळे चौकात झालेय मेंदूचे , मनाचे.   प्रत्येक कामाच्या सुरुवातीला किंवा शेवटी कुठेतरी खाणे , जेवण , अन्न याचा रेफरन्स जोडलेला असतोच. अगदी आजची जन्माष्टमी सुद्धा कृष्णाबरोबरच , अगदी त्या क्षणातच गोपाळकाल्याचा विचार मनात ,   डोळ्यापुढे चित्र आणि जिभेवर चव घेऊनच आली. काही काही पदार्थ कशाच्या तरी जोडीने येतात तेव्हाच छान वाटतात. उगीचच खायला गोपाळकाला केला आहे , हे शक्य असले तरी कानाला जरा जडच जाते. पण गोकुळाष्टमीला जोडून ते एका लयीत येते. मला स्वतःला अंदाज पंचे धागोदरसे वाले पदार्थ आवडतात. इतके ग्रॅम ,   तितके मिलिलिटर , ठराविक टेंपरेचर म्हटले की उगीचच फसणार चे लाल निशाण आधीच फडकायला लागते.   त्या बॅकग्राऊंड वर गोपाळकाला हा पदार्थ यादीत भेळेबरोबरच   अव्वल स्थानावर आहे. चुकायची काळजी नाही. न आवडायचा प्रश्न नाही. कुणाला फारच आवडला तर रेसिपी द्यायची भानगड नाही. जे आहे ते मनोभावे मिसळा , तयार. एवढे सांगितले आणि स्वतःला समजले की पुरे असते. न आवडणाऱ्या ने प्रसाद म्हणून खावा आणि माझ्यासारख्यांनी कृष्णाला आवडतो च्या नावाखाली पोटभर खावा , हेच खरे. वर...

ब्लॅक अँड व्हाईट कहाण्या

Image
  साधारण जुलै-ऑगस्ट मध्ये सगळीकडे सणवार , प्रथा-परंपरा , त्या चूक का बरोबर , त्या त्या दिवसाचे स्पेशल पदार्थ , वाणाच्या वस्तू , साड्या , दागिने याबरोबर आणखीन एक गोष्ट व्हायरल होते. हो गोष्टच , पण त्या त्या सणाची. त्या त्या दिवसाची. श्रावणातल्या कथा , मग कधी त्या आधुनिक साज लेवून   तर कधी अगदी परंपरागत रूपात. प्रत्येक दिवसाला , प्रत्येक सणाला छानशी कथा. आटपाट नगराने सुरू होणा ऱ्या  आणि “उतू नका मातू नका , घेतला वसा टाकू नका” सांगत  ‘सुफळ संपूर्ण’  होणाऱ्या या कथा सांगोवांगीच्याच.  कुठे कधी सुरुवात झाली याचा इतिहास अज्ञातच.   सगळ्या कहाण्या तशा अगदी ब्लॅक अँड व्हाईट. सरळ साध्या. राजा असेल तर , आवडती नावडती राणी. एक   गुणी तर दुसरी अगदी विरुद्ध.   कहाणी ऐकतानाच एकीचा राग यावा आणि एकीचे दुःख कधी संपते याची वाट पहावी , इतका विरोधाभास. नावडती कितीही त्रास झाला तरी चांगलीच वागणार आणि आवडती वाईटच. एक जण वसा चालवणार तर एक जण घेतला वसा टाकणार. सरळ सोट मार्गाने चालणारी कथा. सांगितलेले व्रत   केले की अपेक्षित फळ मिळणारच. देव देवता प्रसन्न होऊन...

निव्वळ वेडेपणा

Image
ऊन - पाऊस - ढग - थंडी - वारा , चक्र चालूच आहे. या चक्रात मध्येच , एखादा सोनेरी क्षण येतो आणि मान वर   केली की आभाळभर पसरलेले इंद्रधनुष्य दिसायला लागतं.   क्षणापूर्वी तर नव्हते इथे. कधी , कसे , केव्हा , तयार झाले ? वाटत असतानाच जाणवते ;   कायमच तयार इंद्रधनुष्य बघितले की. हळूच एक , एक रंगाची पट्टी ओढली जाते या टोकापासून त्या टोकापर्यंत, अर्ध गोल ब्रश फिरतोय झालेच नाही कधी असे!  आकाश तयार होताना कधी पाहिलं ? गोधडीच्या रंगीबेरंगी तुकड्यांसारखे , ढगांचे , संधी प्रकाशाचे , चंद्र-ताऱ्यांचे तुकडे कुणी जोडताना , उसवताना , शिवताना दिसले कधी ? जंगल , अगदी घनदाट तयार झालं कधी ?  किती झाडे , किती वेली , गवतापासून पार दगडावरचे शेवाळे त्यात उगवले कधी ? मुंग्यांपासून गरुडापर्यंत सगळ्यांची घरटी बनली कधी ? दिसले , जाणवले तेव्हा पूर्णच होते चित्र डोंगराने ,   एवढी उंची गाठलीच कशी ?  टोक त्याचं धारदार बनलंच कधी ? तासले वाऱ्याने कडे कधी ? लक्षात आले तेव्हा तयार होते दृश्य छान   कडाडणारी वीज , ढगामागून निघाली केव्हा ? आवाज आणि प्रका...

भेट

Image
  काही भेटी अकारणच लांबत राहिलेल्या असतात. मारुतीच्या शेपटासारखी दोन्ही बाजूंनी अडचणींची यादी तयार असते. ? मनात असेल तर सगळे करता येते , हे याबाबतीत ठार खोटे ठरत असते. मनात असूनही काही वेळा मनच भरपूर सबबी तयार करत असते. काही कारणांवर आपला मुळीच कंट्रोल नसतो आणि काही वेळा कारणंच आपल्याला कंट्रोल करतात. थोडक्यात काय तर भेट टळलेली किंवा टाळलेली असते. टळलेली असेल तर निदान घडवण्यासाठी प्रयत्न तरी केले जातात. टाळायचीच असेल तर चुकून भेटलोच तर , तो अवघडलेपणाचा क्षण फार त्रासदायक होतो.   काही भेटी मात्र जेव्हा होतात , तेव्हा मधला काळ अदृश्यच होतो. मागच्या पानावरून पुढच्या पानावर इतके सहज सोपे असते सगळे. अवघडले पणा नाही. बळेबळेच खोटे खोटे हवा पाणी , ट्रॅफिक , राजकारण असले काही वेळ खात नाही. मूळ मुद्द्यावर यायला वेळ लागत नाही. मुद्दा असण्याचीही गरज उरत नाही. आज हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे , बराच काळ ख्वाबिदाची   आणि डोक्यातल्या विचारांची भेटच झाली नाही. टळली का टाळली यात अर्थ नसला ,   तरी डोक्यातले विचार कागद पेनाला टाळून निघून जात होते एवढे नक्की. मेंदू आहे म्हणजे त्...

अंबाडीची भाजी.

Image
  रोज घरी मीही भाजी पोळीच खाते , तीही… ती नेहमी तशीच भाजी करते , आम्ही दोघी ही… तिच्याच सारखी. तीच्या हाताची चव , तशीच असते कायम आमची , कधी कधी . एरवी मात्र , आठवणी मनात जागवतात तीच चव न चुकता नेहमी. आताशा , बर्याच वर्षात तीने केलीच नाहीय भाजी पण आम्हा दोघीत भर पडलीय , एका तीसरीची ;   तीच्या चवीची आठवण काढत भाजी खाणारीची . तीनेच शिकवलीय , लक्षात ठेवून आवडी जपण्याची पध्दत. न सांगताच   शिकवलीय , त्याच बरोबर भाजीचीही आम्हा सगळ्यांच्या आवडीचीही पध्दत.   तीच्यामुळेच , वर्षभर दरवेळी , त्या सगळ्या भाज्यांकडे बघत आठवणी काढत , आनंदाने जेवताना आठवणींचा एक आवंढा हळूच गिळताना , पुढच्या फोन कॅालवर तीच ती भाजी निवांतपणे चर्चा करायला विषयतरी असतात , असे विषय नाही निघाले तर काही तरी गडबडलेय हे न सांगताच एकमेकानां सांगतात. कोणत्याही बाजारात जावो , भाजी दिसली की ती दिसतेच , निवडायचा , करायचा कितीही आळस आला तरी पिशवीत बसतेच. व्हिडीओ कॅाल करून पुन्हा कशी करू म्हणत म्हणत सगळी उजळणी करणेही आलेच. सगळे म्हणतात आठवणी काढू नयेत , फार मन कशात गुंतवूच ...

बदल

Image
निघाल्या पासून, मन मेंदू ज्या कोणाकडे आठवणींचे department दिलय ते फक्त खुणाच शोधतेय. हे इथे नव्हते पुर्वी आणि इथे होतो ते गेले कुठे? सारखा मेंदू कुरतडून कुरतडून जुन्या images आत्ता दिसणार्या frame शी किती जुळतात हाच खेळ सतत चालूय. जिथे जे हवे होते, ते मिळाले, दिसले नाही की उगीचच अस्वस्थपणा… ते तीथे असण्याचा, नसण्याचा माझ्या रोजच्या आयुष्यावर काडीमात्र परिणाम होत नसतानांही. आता घर जवळ येतेय, सगळं डोळ्यांसमोर रोजच दिसणारे, विसरायचा प्रश्नच नसलेले. समोर बघताना मात्र अडीच वर्ष पुढे गेलेले.. जुळत नसलेले. राग, वैताग, हे का असे? असला वेडा विचार, पोचण्यातला आनंदच घालवतोय. कळतय बदल होणारच, बरेच काय बदललेय तेही माहीत आहे . तरीही शोध काही संपेना. वस्तू, ठिकाणे, रस्ते, दुकाने इथपर्यंत ठिक आहे, पण आता समोर येणारी माणसे, त्यांच्यातले बदल नकोसे झालेत. त्यांची वाढलेली वयं, सुरकुतलेले हात, मंदावलेली गती सगळं नकोसे झालंय. माहीत होते सगळे, मनाला बजावलेलेही होते सगळे पण तरीही, अपेक्षा सगळे पुर्वीसारखेच असण्याची. मी रोज बदलत होते पण यातल्या कुणालाही बदलण्याची परवानगी नव्हती, खिडकी समोरच्या झाडाने पानेही गा...